बीड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात कोणाला विषाणूची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना संसर्गित रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र येणाऱ्या काळात कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी रेखावार यांनी शुक्रवारी सायंकाळी पासून जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे.
या कायद्यानुसार, प्रशासनातील विविध विभागांना काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विमान प्रवास करून आलेल्या व्यक्तीवर विशेषत: लक्ष देण्यात येणार असून, आरोग्य अधिकारी, शल्य चिकित्सक, नगरपालिका यांच्या मार्फत आपत्ती व्यवस्थापनाची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
शहरात आयोजीत करण्यात आलेले मोठे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यासाठी आयोजकांना आग्रह करणे, विमान प्रवास करून आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे अथवा त्यांना विशेष निगराणीखाली ठेवणे याशिवाय कोरोना विषाणू संदर्भात लागणारी औषधे चढ्या भावाने विक्री केली जात आहे का? या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवण्यासंबंधीच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबधीत विभागांतील अधिकाऱ्यांना दिल्या.