बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी होणारी गर्दी लक्षात घेता साखरपुड्याच्या कार्यक्रमातच विवाह उरकल्याचा प्रकार वडवणी येथे घडला आहे. विशेष म्हणजे दोन्ही कुटूंबियांनी लग्नासाठी होणारा खर्च टाळत देशातील कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामध्ये दिली आहे.
हेही वाचा - पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला, बाधितांची संख्या १६ वर
वडवणी येथील माजी आमदार केशवराव आंधळे यांचा पुतण्या मयुर आंधळे आणि शिरुर कासार येथील त्र्यंबकराव खेडकर यांची मुलगी अमृता यांचा रविवारी साखरपुडा होता. यावेळी, दोन्ही परिवारातील सदस्यांची बैठक झाली आणि त्यांनी तेव्हाच विवाह करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कुटुंबीयांसह,पाहुणे मंडळी आणि मित्र परिवारांनीही त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
देशांत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे त्याचा संसर्ग आणि प्रादुर्भाव लक्षात घेता, आंधळे आणि खेडकर कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे आणि या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षाला देण्यात येणारा एक लाख रुपयांचा धनादेश सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याचेही दरम्यान, सोमवारी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे धनादेश सुपूर्त करण्यात येणार असल्याचे आंधळे व खेडकर कुटूंबियांनी सांगितले.