बीड - शेतातील क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. एवढेच नाही तर दोन्ही गटातील लोकांनी चक्क पोलीस ठाण्यातच फ्री स्टाईल हाणामारी सुरू केली. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरी येथे शेतातील नाली खोदण्याच्या वादातून, दोन गटात तुंबळ हाणामारी झालीय. केज पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आल्यावर पुन्हा एकदा ते पोलीस ठाण्याच्या आवारातच एकमेकांशी भिडले.
केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, केजच्या उमरी इथे भाऊराव चाळक आणि शेख अली अकबर यांच्या शेजारी जमीनी आहेत. यावेळी शेतातील जुन्या भांडणाची कुरापत काढून नाली खोदण्याच्या वादावरून दोन्ही गट परस्परांशी भिडले, यामध्ये दगड-विटा आणि लाठ्या काठ्यांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. या घटनेत एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप करून भांडणं सोडवली, त्यानंतर दोन्ही गट एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी केज पोलिस ठाण्यात आले असता, याच ठिकाणी पुन्हा त्यांच्यामध्ये तुंबळ फ्री-स्टाईल हाणामारी आणि दगडफेक झाली. दरम्यान याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांना ताब्यात घेतले आहे.