बीड - माजलगाव नगरपालिकेत 1 कोटी 61 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शनिवारी दुपारी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याधिकारी बी. सी. गावित, लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर,अभियंता महेश कुलकर्णी अशी आरोपींची नावे आहेत. माजलगाव नगरपरिषदेत २२ रस्त्यांची व नाल्यांची कामे न करता अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
माजलगाव नगरपालिकेला ११ जानेवारी २०१७ विशेष रस्ता अनुदानाअंतर्गत १ कोटी ६१ लाख १ हजार १३० रुपयांच्या २२ कामांना मान्यता देण्यात आली होती. प्रशासनाने विविध योजनांअंतर्गत झालेल्या अपहारासंदर्भात ३ मे २०१९ला गठीत केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार या कामांची तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेमध्ये तसेच मोजमापांमध्ये तफावत आढळून आली आहे.
हेही वाचा - चिखलीतील महात्मा फुले पतसंस्थेतील अपहाराप्रकरणी बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपींना अटक
त्यांनंतर, याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश उपसंचालकांनी दिले होते. त्यानुसार माजलगाव नगरपालिका अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी शहर पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीची तक्रार दिली. या तक्रीवरून तत्कालीन मुख्याधिकारी बी. सी. गावित, (सध्या राहता न.प.येथे मुख्याधिकारी), लेखापाल अशोक कुलकर्णी-वांगीकर, अभियंता महेश कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.