बीड - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपला पहिला विजय बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नोंदवला आहे. परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक महाविकास आघाडीच्या उमेदवार आश्रुबाई विश्वनाथ किरवले यांनी जिंकली असून त्यांनी भाजप उमेदवाराचा तब्बल 1395 मतांनी पराभव केला.
हेही वाचा - नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला
परळी तालुक्यातील सर्वात मोठ्या सिरसाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी रविवारी 8 डिसेंबरला पोटनिवडणूक झाली. या निवडणूकीत मुंडेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आश्रुबाई किरवले या उमेदवार होत्या. राज्यात नव्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर त्याचा पहिलाच प्रयोग धनंजय मुंडेंनी सिरसाळा या आपल्या मतदारसंघात करताना तिन्ही पक्षांना एकत्रित करून एकच उमेदवार दिला होता.
हेही वाचा - 'स्टेट बँके'चे गृहकर्जासह वाहनकर्ज स्वस्त; सलग आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात
किरवले यांनी भाजपच्या उमेदवार आशाबाई कपिल चोपडे यांचा 1395 मतांनी पराभव केला. मतमोजणी नंतर गावातून भव्य मिरवणूक काढून महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी नूतन सरपंच आश्रुबाई किरवले यांचे अभिनंदन केले आहे.