बीड - जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये लुखामसला येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी (आज) समोर आली आहे. हे भांडण शेत जमिनीच्या बांधावरुन सुरू झाले. किरकोळ भांडणाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. यामध्ये तिघे जण जखमी आहेत. सविताबाई थोरात, अनुराज थोरात, केशव थोरात अशी गंभीर जखमींची नावे आहेत. या घटनेबाबत गेवराई पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, शेतरस्त्याच्या वादातून सात जणांनी संगणमत करुन तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून या जखमींवर तत्काळ गुन्हा दाखल करा, त्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यात जखमीनी ठिय्या मांडला होता. दरम्यान वरिष्ठ पोलिसांच्या आश्वासनानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
गेवराई तालुक्यातील लुखामसला शिवारात गट क्रमांक 16 मध्ये सविताबाई थोरात यांची जमीन असून या रस्त्यावरून सविताबाई थोरात व त्यांची दोन मुले अनुराज थोरात, केशव थोरात यांनी शेतात ऊस लागवडीसाठी ट्रॅक्टरमधून उसाचे बेणे नेले. दरम्यान तुम्ही रस्त्यावरून ट्रॅक्टर का नेले, या कारणावरून शुभम वसंत व्हरकटे, वसंत व्हरकटे, नंदकुमार अंकुश सरगर, रावसाहेब दगडूबा व्हरकटे, करण वसंत व्हरकटे, रेखा वसंत व्हरकटे, दिव्या वसंत व्हरकटे यांनी वाद घातला. यानंतर संगणमत करुन काठी-कुर्हाडीने थोरात बंधूसह त्यांच्या आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये अनुराज याला डोक्यात कुर्हाडीचा गंभीर घाव लागल्याने तो रक्तबंबाळ झाला. तर आई सविताबाई व केशव यांना देखील काठीने जबर मारहाण करण्यात आल्याने त्या देखील जखमी झाल्या. जखमी असलेल्या तिघांनाही गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करुन अनुराज याला गंभीर मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींनी पोलीस ठाणे गाठून आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र ठाणे अंमलदार व बीट अंमलदार देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने जखमींनी ठाण्यात ठिय्या मांडला. यावेळी पोलीस निरीक्षक रविंद्र पेलगुरवार व सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी आश्वासन दिल्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान यापुर्वी देखील आरोपींनी आम्हाला मारहाण केली होती, यामुळे कारवाई करा, अशी थोरात कुटुंब पोलिसांकडे आग्रह करत आहे.
हेही वाचा -Manhole Horror उघड्या गटारात पडल्या २ महिला, घटना सीसीटीव्हीत कैद