बीड- बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. या मतदानावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन, बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले होते. मात्र तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते देखील आता त्यांचं ऐकत नसल्याचा टोला मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सेवा संस्था मतदार संघातील ११ जागांवर उमेदवार ठेवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयात देखील यश आले नाही. त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन, मतदान न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. यावरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. शनिवारी बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले, संपूर्ण प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली. मात्र विरोधकांना पराभव दिसत असल्याने, त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला अशी टीका यावेळी त्यांनी केली.
भाजप जिल्हा बॅंकेला शिस्त लावण्यात अपयशी
मागील पाच वर्षाच्या काळात बीड जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता होती. त्यावेळी जिल्हा बॅंक प्रशासनाला त्यांनी कुठल्याचप्रकराची शिस्त लावली नाही. उलट आता सत्ता गेल्यावर आमच्यावर आरोप करून चिखलफेक करत आहेत. स्वतःकडे सत्ता असताना काहीच केले नाही. असा आरोपही यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे.
मतदान केंद्रावर गोंधळ
दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. यावेळी परळीच्या मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मतदानाची वेळी संपली तर मतदान कसे सुरू ठेवले, असा सवाल भाजपने उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. एकोंएकांवर खुर्चा देखील फेकण्यात आल्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी संबंधित मतदान केंद्राला भेट देऊन, दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटले आहे.