बीड - जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, मृत्यूदर देखील वाढलेला आहे. याचाच परिणाम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे एकाच चितेवर आठ कोरोनाबाधित मृतदेहांचे दहन केले असल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये 1 ते 8 सप्टेंबर या आठ दिवसांमध्ये तब्बल 38 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बळींची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अंबाजोगाई येथे एकाच सरणावर 8 मृतदेह जाळण्याची वेळ नगरपालिका प्रशासनावर आली असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनलेला असतानाच मृतांचा आकडा देखील तसाच वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आतापर्यंत कोरोनाने 173 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 ते 8 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 38 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील बहुतांश जण हे वृद्ध व अन्य आजाराने पीडित असल्याचे सांगितले जात असले तरी रोज चार ते पाच जणांचा मृत्यू होत आहे.
दरम्यान, सहा सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आठ मृतांचा अंत्यविधी मांडवा रोडवर असलेल्या नगर परिषदच्या स्मशानभूमीत एकाच सरणावर केला. कोरोना मृतांची विल्हेवाट लावणे हे देखील अंबाजोगाई नगरपालिकेला डोके दुखीचा विषय बनला आहे.