बीड - लोकसभा मतदारसंघातून पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरविणार आणि जनतेने यापूर्वी ज्या विश्वासाने जबाबदारी टाकली ती देखील मी पूर्ण करणार, अशी प्रतिक्रिया डॉ. प्रीतम मुंडे यांनी परळी येथे दिली.
डॉ. प्रीतम मुंडे म्हणाल्या, लोकशाहीमध्ये पूर्ण क्षमतेने लढण्याचा प्रत्येक उमेदवाराला अधिकार आहे. त्याप्रमाणे आम्ही पूर्ण क्षमतेने लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहोत. त्याच पद्धतीने विरोधक देखील पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत असतात आमच्या नेत्या पंकजा मुंडे निर्णय घेतात तो आम्हा सगळ्यांना मान्य असतो. १०० पैकी १० लोकांची नाराजी असू शकते. मात्र, त्यातूनही मार्ग काढत पुढे जाणारा अधिक चांगला असतो.
भाजपने गुरुवारी जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे यांचे नाव २८ व्या क्रमांकावर होते. आतापर्यंत डॉ. प्रीतम मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची जाहीर घोषणा झाली नव्हती. परंतु, आता बीड लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नावाची भाजपतर्फे घोषणा करण्यात आली आहे.