बीड - जिल्ह्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि काही भागात गारपीट झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी यांनी नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत, असे आदेश मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. यामुळे, बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. महाविकासआघाडीच्या सरकारकडून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.