बीड - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान हुतात्मा झाले. हा एक प्रकारचा राज्य सरकारचा अकार्यक्षमतेचा पुरावाच आहे. सरकारला प्रत्येक जवानाच्या बलिदानाचे उत्तर द्यावे लागणार आहे, असे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे म्हणाले.
नक्षली हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील तोसिफ शेख या जवानाच्या कुटुंबीयांची धनंजय मुंडे यांनी मंगळवारी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी ते म्हणाले, तोसिफ शेख यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जवानांवर हल्ला होणे हा एक प्रकारचा राज्य सरकारचा अकार्यक्षमतेचा पुरावाच आहे. सरकारला प्रत्येक जवानाच्या बलिदानाचे उत्तर द्यावे लागणार आहे.
यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद सदस्य संदीप शिरसागर, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे , महेंद्र गर्जे, आप्पासाहेब राख, शिवभूषण जाधव, राजू घुमरे यांची उपस्थिती होती.