बीड - भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी चुकीची भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध परळी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. "मला संपवण्यासाठी असा प्रयत्न होत आहे. जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्यासाठी असा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नव्या आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवले असून, मला जग सोडून जावं वाटत आहे,” असं सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी बोलताना धनंजय मुंडेंना अश्रू अनावर झाले.
धनंजय मुंडे यांच्या १७ तारखेला विडा येथे झालेल्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यातील धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मी १७ तारखेला बोललो होतो. मात्र, ती क्लिप १९ तारखेला व्हायरल झाली. माझे भाषण लाईव्ह दाखवण्यात आले होते. जर मी चुकीचं बोललो असतो, तर लगेच माझ्यावर टीका झाली असती असेही मुंडे म्हणाले. माझ्या मागे कुणाचे नाव नव्हते, लोकांची कामे करून लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. स्वतःच्या कर्तृत्वानं नायक झालो, पण आता खलनायक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुंडे म्हणाले. मी कधीही कुणाचं मन दुखावेल असं बोललो नाही. मतांच राजकारण कधीच केले नाही. या बहिणीसाठी मी २००९ साली या मतदारसंघांचा त्याग केला होता. मी नाती कशी सांभाळतो हे जनतेला माहिती आहे. मात्र, नव्यानं आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणत धनंजय मुंडेंनी सुरेश धसांवर अप्रत्यक्ष टीका केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे मुंडे म्हणाले.
माझ्यावर एवढे चुकीचे आरोप होत असतील तर असे राजकारणही नको आणि जीवनही नको, अशी भावना धनंजय मुंडेंनी यावेळी व्यक्त केली. ज्यांनी कोणी हे केले आहे त्याला जनताच न्याय देईल असेही ते म्हणाले. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर वेगळेच काही घडले असते. मला संपवण्यासाठी जर असे प्रकार घडत असतील, तर हे अत्यंत गंभीर असल्याचे मुंडे म्हणाले.
एकदा सांगितले असते तर माघार घेतली असती
मला एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करणे शक्य नाही. पंकजांनी माझ्यावर अनेक शब्दप्रहार केले आहेत. मात्र, मी पातळी कधीच सोडली नाही. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन मला बदनाम करण्याचा पर्यत्न केला जात असल्याचे मुंडे म्हणाले. त्यांनी फक्त एकदा सांगितले असते तर मी निवडणुकीतून माघार घेतली असती. पण असे कृत्य करायला नको होते असेही मुंडे म्हणाले. मी बहिणीचे नाते मानणारा आहे. मी कधीही त्यांच्याबद्दल चुकीचे बोललो नसल्याचे मुंडे म्हणाले.
आमच्या बहिणाबाईला डोळ्यासमोर पराभव दिसू लागताच व्हिडिओ क्लिप एडिट करून व्हायरल करण्याचे षडयंत्र त्यांनी सुरू केले आहे. 'ती' क्लिप एडिट केलेलीच आहे. मी असे बोललोच नाही, असा खुलासा धनंजय मुंडेंनी केला. बदनामीच करायची होती तर दुसरे कुठलेही कट-कारस्थान केले असते तरी चाललं असतं. मात्र बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा लावणारा प्रकार भाजपच्या लोकांनी केला आहे. धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी भाजप कटकारस्थाने करत असल्याचे मुंडे म्हणाले.