बीड- आष्टी तालुक्यासह काही भागात नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे, तसेच काही जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. मानवी वस्तीत या बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बिबट्याला तातडीने पकडावे, अथवा पकडने शक्य नसल्यास ठार मारावे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्य वनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी आपल्या मागणीचे पत्र मुख्य वनसंरक्षक अधिकारी नागपूर, विभागीय वन अधिकारी औरंगाबाद आणि वन अधिकारी बीड यांना पाठवले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नागनाथ गर्जे रा. सुरुडी, स्वराज सुनील भापकर रा. भापकरवाडी ता. श्रीगोंदा आणि सुरेखा नीळकंठ बळे रा. पारगाव जोगेश्वरीया अशी मृतांची नावे आहेत. तर शालन शहाजी भोसले, विजय भोसले, शिलावती दत्तात्रय दिंडे आणि अभिषेक दत्तात्रय दिंडे हे या बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. सध्या शेतात रब्बीचा हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना शेतात जावे लागते, मात्र बिबट्याची दहशत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. तसेच मानवी वस्तीत अनेकवेळा या बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मानवी जीवास धोकादयाक ठरलेल्या या बिबट्याचा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 11(1)(क) अनुसार तातडीने बंदोबस्त करावा, बिबट्याला पकडणे शक्य नसल्यास त्याला मारण्यात यावे अशी मागणी या पत्रातून आमदार सुरेश धस यांनी केली आहे.