बीड - पाटोदा तालुक्यातील अंतापुर येथे एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना शनिवारी समोर आली. दीड महिन्यापूर्वीच त्या महिलेचा विवाह झाला होता. या प्रकरणात महिलेच्या वडिलांनी पती व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संध्या उमेश गाडे (१८) रा. अंतापूर, ता. पाटोदा असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
पती उमेश चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत होता. तिच्या वडिलांनी फोन केला, तरी तो तिला बोलू देत नव्हता. २८ सप्टेंबर रोजी संध्याचे आई-वडील तिला भेटण्यासाठी गेले असता तिने पतीकडून सतत होत असलेल्या छळाबद्दल त्यांना सांगितले होते. १ ऑक्टोबर रोजी पहाटे संध्याचा सासरा अशोक रामा गाडे याने तिच्या वडिलांना फोन करून संध्या बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता त्याने पुन्हा फोन केला आणि संध्याचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगत असल्याची माहिती दिली. वडिलांनी तत्काळ अंतापूर येथे धाव घेत इतर ग्रामस्थांच्या मदतीने संध्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, संध्याला पोहता येत असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि सासऱ्याने तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला, अशी तक्रार त्यांनी दिली आहे. या तक्रारीवरून उमेश अशोक गाडे आणि अशोक रामा गाडे या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.