बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यावर प्रचारादरम्यान एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील धर्माळा येथे घडली.
गेल्या आठ दिवसांपासून बीड जिल्ह्यात खून, मारामाऱ्या आणि हल्ल्या सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बीड लोकसभा निवडणुका दहशतीच्या सावटाखाली असतानादेखील बीड जिल्हा पोलीस मात्र, शांत आहेत. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला करणाऱ्यांनादेखील पोलिसांचे अभय मिळत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. माझ्या पत्नीवर जाणीवपूर्वक हल्ला करण्याचे काम भाजपने केले आहे. तो हल्लेखोर भाजपचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
गणेश मिटू कदम असे हल्ला करणाऱ्या माथेफिरूचे नाव आहे. सोनवणे यांच्या पत्नी तथा वडगाव जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य सारिका सोनवणे या सभा घेत होत्या. सभा सुरू असतानाच अचानक कदम या माथेफिरूने थेट सारिका यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात सारिका या थोडक्यात बचावल्या आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या ८ दिवसांत खून, मारामाऱ्या आणि हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे म्हणाले, धर्माळा या गावात पत्नी आणि बहीण माझ्या प्रचारासाठी गेली असता भाजपच्या कार्यकर्त्याने कोयता हातात घेऊन माझ्या पत्नीवर हल्ला केला. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. डोळ्यासमोर पराभव दिसताच भाजप अशाप्रकारे महिलांवरदेखील हल्ले करत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे.
याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा सरपंच वैद्यनाथ सोळुंके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना बीडचे पोलीस अधीक्षक श्रीधर म्हणाले की, वैयक्तिक अडचणीमुळे ही घटना घडलेली आहे.