बीड- मागील पंधरा दिवसांहून अधिक काळापासून बीड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. यामध्ये परळी तालुक्यात काही भागात सोयाबीनसह इतर पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बुधवारी शेतकऱ्यांनी परळी येथील तहसील कार्यालयाकडे निवेदन देऊन तालुक्यातील सुकलेल्या सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
एकीकडे राज्यातील काही भागात पूर परिस्थिती आहे. तर, दुसरीकडे बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, परळी तालुक्यातील पाऊस कमी झाल्यामुळे सोयाबीन, मुग, उडीद व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेमके सोयाबीनच्या लागवडीवेळी पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेंगांचे प्रमाणदेखील अत्यल्प असल्याचे शेतकरी राजेश गित्ते यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शासनाने पंचनामे करून तत्काळ 25 हजार रुपये प्रति हेक्टर मदत घावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजापाचे राजेश गित्ते यांनी दिला आहे.
हेही वाचा - नाळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना मारहाण