बीड - सध्या जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून खून अन् मारामाऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बिहार म्हणून बीडची ओळख होऊ लागली आहे.
मागील २ दिवसापूर्वी राजकीय वैमनस्यातून परळी येथे खून झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याशिवाय बुधवारी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसाढवळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद आहे. त्यामुळे जिह्यात लोकसभा निवडणूक निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पडतील का? असा प्रश्न आता बीडकर यांच्या मनात निर्माण झाला आहे.
राजकारण म्हटले, की आरोप-प्रत्यारोप होतच असतात. पूर्वी निवडणुकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे नेते निवडणुका संपल्यानंतर एकमेकांबाबत दुरावा ठेवत नव्हते. मात्र, अलीकडच्या काळात बीडमध्ये हे होताना दिसत नाही. येथील राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. ३ दिवसापूर्वी जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा निर्घुण खून करण्यात आला. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेतून हा खून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा जाहीर आरोप केला. यामुळे राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण राहिले नसल्याचा प्रत्यय बीडच्या जनतेला येत आहे.
नगरसेवकाच्या खुनाची घटना ताजी असतानाच गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. भाजपच्या लोकसभेचा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्ज आणि अर्जासोबत दिलेली माहिती अपूर्ण आहे. तसेच त्यांनी बहुतांश माहिती लपवली असल्याचा आक्षेप मुंडे यांनी घेतला होता. त्यांच्या या आक्षेपामुळेच त्यांच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला झाला. या हल्ल्यावेळी पोलीस जवळ असताना देखील पोलिसांनी तो हल्ला रोखला नाही. या सर्व घटनांमुळे बीडची वाटचाल बिहारकडे होत असल्याचा प्रत्यय बीडकरांना येऊ लागला आहे.