बीड - विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील राजकिशोर मोदी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राजकिशोर मोदी हे अनेक वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून सर्वपरिचित आहेत. याशिवाय दिवंगत विलासराव देशमुख यांच्याशी मोदी यांचे अत्यंत जवळचे राजकीय संबंध होते. मोदी यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला अजून एक आमदारकी मिळत आहे.
निष्ठेचे फळ मिळाले...
दिवंगत विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर मागील काही वर्षात अनेक स्थितीत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीत देखील राजकिशोर मोदी यांनी काँग्रेसचा हात सोडला नाही. मोदींना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले असल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मागील 10 वर्षात राजकिशोर मोदी हे राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात त्यांचा कामाचा ठसा उमटलेला आहे. काँग्रेसच्या राजकारणात दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू अशी मोदी यांची ओळख आहे. तर अशोक चव्हाण यांच्याशीही मोदी यांचे चांगले संबंध आहेत. राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळत आहे.