बीड - प्लॉटचा फेरफार मंजूर करून देण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लिपिकासह एका मध्यस्थी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. ही घटना मंगळवारी सायंकाळी बीड येथे घडली. पठाण मुस्ताक खान (लिपिक तहसील कार्यालय बीड) व मध्यस्थी अशोक गंगाधर शेजवळ (राहणार बीड) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, तक्रारदार यांचा एक प्लॉट बीड तालुक्यातील पालीजवळ आहे. त्या प्लॉटचा फेरफार मंजूर करून देत असताना पठाण मुस्ताक यांनी तक्रारदार यांना पाच हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्यास तक्रारदार तयार नसल्याने त्यांनी याबाबतची सर्व माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सांगितली. यानुसार सापळा रचून मंगळवारी पठाण मुस्ताकखान यांना पाच हजार रुपये देण्याचे ठरले. पठाण यांनी त्यांच्या जवळचा खासगी व्यक्ती अशोक गंगाधर शेजवळ यांच्याकडे पाच हजार रुपये देण्याचे फोनवर सांगितले.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यानुसार सापळा रचून खासगी व्यक्ती अशोक शेजवळ याच्यासह मुख्य आरोपी पठाण मुस्तफा खान यालाही सक्षम पुराव्यासह अटक केली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी सांगितले.