बीड - जिल्ह्यातील धारूर येथील हनुमान चौकातील एका ग्राहक सेवा केंद्रावर औरंगाबाद पोलिसांनी छापा टाकून नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश बुधवारी केला आहे. यात एकाला ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीड लाख बनावट नोटा हस्तगत
याबाबत सविस्तर माहिती अशी, की औरंगाबाद टीव्ही सेंटरमध्ये दोन संशयित आरोपी नकली नोटा चालवत असल्याच्या माहितीवरून संदीप आरगडे व निखिल संबेराव या दोघांना (रा. बेगमपेठ, औरंगाबाद) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांकडून दीड लाख बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून मुख्य आरोपी आकाश संपती माने धारुर, यास सिडको औरंगाबाद गुन्हे अन्वेषण पथकाने धारुर येथे छापा टाकून बुधवारी अकराला ताब्यात घेतले. यावेळी काही बनावट नोटा व छपाईचे साहित्य आढळून आले.
पथकात पो. उपनिरिक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह पो. हे. कॉ. नरसिंग पवार, दिनेश बन, सुभाष शेवाळे, प्रकाश डोंगरे, विशाल सोनवणे, गणेश नागरे, सुरेश भिसे, स्वप्नील रत्नपारखी यांचा समावेश आहे.
अनेक महिन्यांपासून सुरू होते रॅकेट
गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात नकली नोटा आढळून येत असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र अधिकृत तक्रार नसल्याने कुठलीही कारवाई होत नव्हती. आज मात्र बाहेरुन आलेल्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे हनुमान चौकात एका बँक ग्राहक केंद्र, झेरॉक्स सेंटरवर छापा टाकला. यात २०० रु.च्या नकली नोटा आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.