बीड - भाजपा कार्यकर्ते आज जिल्हाधिकारी परिसरात कृषिमंत्री दादा भुसे यांना भेटले. यावेळी त्यांना निवेदन देत शेतकऱ्यांना कर्जमाफी व बांधावर खतांसह बियाणे पुरवावे, अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळत नाही. बँकांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. याशिवाय जिल्हा प्रशासन देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. मात्र, त्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे व खत त्यांच्या बांधावर मिळत नाही, अशी वस्तूस्थिती आहे. या प्रश्नाकडे सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी देखील भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली.
यंदा शेतकऱ्यांचा कापूस देखील शासन खरेदी करू शकलेले नाही. त्यामुळे बळीराजा अधिकच संकटात सापडलेला आहे. अशा बिकट परिस्थितीत बँका देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत आहे. सहजासहजी कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले असल्याचे मस्के म्हणाले.
भाजपाचे राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात -
पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळणारे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे. तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागणीसाठी भाजपा सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. राज्य सरकारच्या ‘बांधावर खत आणि बियाणे’ या योजनेचा बोजवारा उडालेला आहे. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे भाजपाने आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितले.