बीड - औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवताना भाजपाला अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे देखील मोठे आव्हान राहणार आहे. या मतदारसंघातून भाजपाने शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, आता भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले रमेश पोकळे यांनी बंडखोरी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. तथापि, याबाबत दोन दिवसांत त्यांना भेटून मार्ग काढू, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा - पदवीधर, शिक्षक मतदारसंघात उमेदवारी देताना साताऱ्यावर अन्याय - दीपाली गोडसे
निष्ठावताला नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी...
भाजपाचे निष्ठावंत असलेल्या रमेश पोकळेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याने अनेक ठिकाणच्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. रमेश पोकळे त्यांनी फेसबुकवरुन तशी घोषणा केली आहे. पोकळेंची बंडखोरी शिरीष बोराळकर आणि भाजपाच्या अडचणी वाढविणार आहेत. रमेश पोकळे हे भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोमवारी सायंकाळी सात वाजता बीडमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये रमेश पोकळे यांची बंडखोरी रोखण्यासाठी ते काय प्रयत्न करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपाचे ४ उमेदवार जाहीर -
भारतीय जनता पक्षाने विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या ४ विभागातील उमेदवारांची नावे भाजपकडून जाहीर करण्यात आले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्राम देशमुख, औरंगाबादेतून शिरीष बोराळकर, नागपूरमधून संदीप जोशी आणि औरंगाबादेतून नितीन धांडे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. याबरोबरच उत्तर प्रदेशातील रिक्त ९ जागांसाठीही भाजपाने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.
दोन दिवसातच जाहीर होणार निकाल -
या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत या पाचही मतदारसंघात उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 13 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात येणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. या पाच मतदारसंघात 1 डिसेंबरला मतदान होणार असून दोन दिवसांनी म्हणजेच 3 डिसेंबरला या पाचही जागांचा निकाल जाहीर होणार आहे.