बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील वाळू पट्ट्यांचे लिलाव अनेक वर्षापासून रखडलेले असल्याकारणाने चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. वाळू वाहतूक करणारे टिप्पर सुसाट वेगाने धावतात, त्यामुळे अनेक अपघात गेल्या वर्षभरात झालेले आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ गेवराई विधानसभा मतदारसंघातील अवैध वाळू वाहतूक थांबवावी, अन्यथा वाळू पट्ट्यांचे लिलाव करावेत, अशी मागणी करत गेवराईचे भाजपचे आमदार अॅड. लक्ष्मण पवार हे गेवराई येथील तहसील कार्यालयासमोर आज उपोषणाला बसले.
तहसील कार्यालयासमोर आंदोलन
गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक केली जाते. यापूर्वी अनेक वेळा अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र, अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ठोस उपाययोजना करत नाही. हीच अनेक वर्षातील वस्तुस्थिती आहे. अखेर अवैध वाळू विरोधात भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांनाच आंदोलन करावे लागले असून, मंगळवारी गेवराई येथील तहसील कार्यालयासमोर आमदारांनी आंदोलन सुरू केले आहे.
हेही वाचा - बीडमध्ये 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीची आत्महत्या
बीड जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आमदार पवार यांनी म्हटले आहे की, गेवराई तालुक्यातील गोदा पट्ट्यामधून अवैध वाळू वाहतूक करणारी मोठी टोळी सक्रिय आहे. वाळू माफियांना प्रशासनाची कसलीच भीती राहिलेली नाही. असा आरोप देखील यावेळी आमदार लक्ष्मण पवार यांनी केला. जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून एकही वाळू टेंडर निघालेला नाही. त्यामुळे, अवैध वाळू उपशाचे प्रमाण वाढले आहे आणि यापासून कित्येक अपघात घडले आहेत. मात्र, प्रशासन किंवा शासन यामध्ये लक्ष घालत नसल्याचे दिसून येत आहे. आमदाराच्या या भूमिकेला रासप व मनसेच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊनही सुटेना प्रश्न -
केवळ गेवराई तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्यातच अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अवैध वाळू वाहतूक तत्काळ थांबवण्याबाबत वारंवार नागरिकांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारी केल्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून शून्य कारवाईची स्थिती असल्यानेच वाळूमाफियांचे फावत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - ना गुलाल...ना मिरवणूक, स्वच्छता मोहीम राबवत साजरा केला विजयाचा आनंद!