बीड - जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांची निवड कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर शनिवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत निर्णय दिला आहे. येत्या 30 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 11 पंचायत समितीचे सभापती आणि 4 जानेवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
20 डिसेंबर रोजी पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर पंचायत समित्यांचे सभापती केव्हा निवडले जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत होती. अखेर शनिवारी जिल्हाधिकारी कुंभार यांनी जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची निवड 30 डिसेंबर रोजी घेण्यासंदर्भात निर्णय दिला. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी ४ जानेवारीला मतदान होणार आहे.
हेही वाचा - भारत धर्मशाळा आहे का? नागरिकत्व कायद्यावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारला प्रश्न
असे आहे पंचायत समिती निहाय आरक्षण -
सभापती पदासाठी ३० डिसेंबरला विशेष बैठकीत निवडणूक होणार आहे. जिल्हयातील ११ पैकी शिरुर कासार पंचायत समिती अनुसूचित जाती महिलेसाठी, अंबाजोगाई, केज, पाटोदा, वडवणी येथील सभापतीपद महिलेसाठी राखीव आहे. तर गेवराई, धारुर, बीड या ठिकाणी सर्वसाधारण सभापती असणार आहेत.
हेही वाचा - एल्गार परिषदेच्या प्रकरणाची 'एसआयटी' तर्फे चौकशी व्हावी; शरद पवारांची मागणी
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच होणे अपेक्षित आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गत आठवड्यात जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र आतापर्यंत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी विशेष हालचाली झाल्याचे पाहायला मिळालेले नाही. अशा परिस्थितीत कोणत्या पक्षाकडे जिल्हा परिषदेत सूत्रे जातात? तसेच कोण जिल्हा परिषद अध्यक्ष होईल याकडे सर्वांच्या नजरा आहेत.