बीड : जिल्ह्यात 8 ठिकाणी एमआयडीसीची जागा आरक्षित केलेली आहे आणि या जागेवर फक्त बीड शहर सोडता अन्य 7 ठिकाणी उद्योग, व्यवसाय नाहीत. बीडच्या (Blood Letter To CM) वडवणी तालुक्यातील चिंचाळा या गावातील अंकुश पवार या तरुणाने स्टील घासणीचा लघू उद्योग चालू केला होता. मात्र, याला बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने त्याने चक्क स्वतःच्या रक्तानेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. आता मुख्यमंत्री या पत्राची दखल घेऊन या तरुणाला कर्ज मिळवून देतील का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
माझा स्टील घासणीचा उद्योग आहे. मला हा उद्योग वाढवण्यासाठी पैशाची गरज असल्याने मी गेल्या एक वर्षापासून सातत्याने तेलगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेत मुद्रा लोनसाठी चकरा मारत आहे. परंतु, बँकेचे मॅनेजर मला प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारण देत कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आज शेवटी मी रक्ताने पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली - अंकुश पवार, तरुण उद्योजक
मग मुद्रा लोन योजनेचा फायदाच काय? - तरुणांना उद्योग क्षेत्रात येण्यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना आखण्यात येत आहेत. तर तरुणांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने मुद्रा योजना कार्यान्वित केलेली आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील अंकुश पवार या तरुणाने उद्योगात गुंतवणुकीसाठी एक वर्षापासून मुद्रा योजनेतून अर्ज केला आहे. अंकुशने बँक ऑफ इंडिया, शाखा तेलगाव यांच्याकडे मुद्रा लोनच्या कर्जाची मागणी केली होती. परंतु बँक मॅनेजर वारंवार कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, असे त्याने सांगितले आहे.
तरुण उद्योजक घडतील तरी कसे? - तरुण उद्योजक अंकुश पवार याने स्वतःच्या रक्ताने पत्र लिहित थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागितला आहे. या घटनेमुळे तरुणांना उद्योगासाठी कर्ज घेण्यासाठी बँकेकडून किती पिळवणूक केली जाते, हे यावरून दिसून येते. अशी परिस्थिती असेल तर तरुणांनी उद्योग तरी कसे करावे. तरुणांना बॅंक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी टाळाटाळ करत असतील तर तरुण उद्योजक घडतील तरी कसे, असे प्रश्न अंकुशने उपस्थित केले आहेत.