बीड - जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या वैयक्तिक ई-मेलचा एका अज्ञाताने गैरप्रकार केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. याप्रकरणी पाटोद्याचे तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मंगळवारी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पाटोद्याचे तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 सप्टेंबर 2020रोजी दुपारी 2 वाजून 53 मिनिटांच्या सुमारास एका अज्ञाताने पाटोदा तहसील कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीचा गैरवापर करुन एक मॅसेज पाठवला. दरम्यान, तहसीलदारांनी या ई-मेलबाबत खात्री केली असता कोणीतरी अज्ञातांनी जिल्हाधिकारी यांच्या वैयक्तिक आयडीचा गैरवापर करुन तो ई-मेल पाटोदा तहसील कार्यालयाच्या ईमेलवर पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीच्या नावाची खात्री करण्यात आली. मात्र, शोध लागत नसल्याने तहसीलदारांनी सोमवारी पाटोदा ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरुन अज्ञाताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक माने या प्रकरणाचा तपास करत आहेत.