बीड Beed Bhalchandra Ganapati : बीड हा देवी-देवतांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक देवी देवतांचे मंदिर पाहायला मिळतात. पुरातन काळातील अनेक अवशेषही बीड जिल्ह्यात पाहायला मिळतात. त्याचबरोबर पौराणिक कथांमधली देवी देवता वास्तव्यास या ठिकाणी होत्या, याच्या देखील अनेक आख्यायिका आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण भालचंद्र गणेशाची स्थापना कशी झाली, याविषयी जाणून घेऊ या.
प्रत्येक ग्रंथामध्ये उल्लेख : हा गणपती चंद्रदेवानं स्थापित केलेला आहे, असा उल्लेख काही ठिकाणी दिसून येतो. या गणपतीचा बहुतांश ग्रंथामध्ये उल्लेख आहे. ज्यावेळेस चंद्रदेवाला शाप मिळाला होता, त्यावेळेस चंद्रदेव या ठिकाणी पापमुक्त होण्यासाठी आले होते. चंद्रदेवाला या ठिकाणी अनुष्ठान करण्यास सांगितलं होतं. गंगेच्या दक्षिण तीरावर अनुष्ठान केल्यानंतर तू पाप मुक्त होशील, असं देवाला सांगितलं गेलं होतं. या ठिकाणी आल्यानंतर चंद्रदेवानं अनुष्ठान करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मूर्ती चंद्रपुसकर्णी नावाच्या तीर्थातून प्रगट झाली. या ठिकाणी ती स्थापित केली. त्यावेळी तेहतीस कोटी देव या गणपतीच्या स्थापनेला होते, असं मानण्यात येतं, अशा प्रकारच्या पुराणातल्या कथा या गणपती संदर्भात सांगितल्या जातात. 1630 साली ज्ञानदेव भुसारी यांनी येवल्याची लढाई जिंकली. त्यांनी या मंदिराची निर्मिती केली. त्यानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली, अशीही एक आख्यायिका आहे, असं पुजारी वरदराव जोशी यांनी सांगितलं. (Beed Bhalchandra Ganapati limbaganesh)
नावाची आख्यायिका : या गणपतीचं नाव भालचंद्र ठेवलं यामागे मोठं कारण आहे. या ठिकाणी लिंबासूर नावाचा एक राक्षस वास्तव्यास होता. ज्यावेळी चंद्रदेव देवाची आराधना करण्यासाठी बसायचे, त्यावेळेस लिंबासूर त्यांना अडचण निर्माण करायचा. इतरही लोकांना त्याचा त्रास होत असे. म्हणून चंद्रदेवतेनं लिंबासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यानंतर या गावाचं नाव लिंबागणेश असं पडलं. तर चंद्रदेवतेनं स्थापन केलेला गणेश म्हणून भालचंद्र हे या गणपतीचं नाव आहे. या ठिकाणी मोठा उत्सव भरतो. या उत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह अबाल वृद्ध देखील सामील होतात, असं पूजारी गणेश जोशी सांगतात. (Bhalchandra Ganapati story)
भालचंद्र गणेश : बीड जिल्ह्यात पाच गणपतीपैकी एक गणपती आहे, तर भारतातील 21 गणपतींपैकी एक आहे. त्यास भालचंद्र गणेश म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे या परिसरात असलेल्या बारा वाड्या व तेरावे लिंबागणेश या ठिकाणी एकच गणपती असतो. इतर ठिकाणी कुठेही गणपती उत्सव साजरा केला जात नाही. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या इच्छा पूर्ण होतात, अशीही एक वदंता आहे. अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात, असं भाविक गणेश ढवळे यांनी सांगितलंय.
गणपतीच्या दर्शनाची आवड : मी अगदी लहानपणापासून या गणपतीच्या दर्शनासाठी येतेय, असं भाविक जयश्री नांदे यांनी सांगितलंय. हे गाव माझ्या मामाचा असल्यामुळं अगदी लहानपणापासूनच या गणपतीच्या दर्शनाची आवड निर्माण झालीय. गेल्या अनेक पिढ्यांपासूनच पुरातन काळातील हेमाडपंथी मंदिर आजही अगदी तसंच आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
हेही वाचा :