अंबाजोगाई - मागील वर्षाच्या काळात कोरोना संकटामुळे लोकांचे जीवनमान विसकळीत झाले आहे. लोक त्रस्त आहेत. रोजगार आणि व्यापार नसल्याने आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी या प्रश्नी वीजबिलाचे हप्ते पाडून दिल्यास ग्राहकांना बिल भरणे सोयीचे होईल. तरी या प्रश्नी सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि सक्तीची वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक महादेव आदमाने यांनी कार्यकारी अभियंता महावितरण यांना निवेदनाद्वारे केली आहे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
नाशिक परिमंडळात वीज ग्राहकांना मोबाइलद्वारे 15 दिवसांची मुदत दिली जात आहे. मात्र आपल्याकडे वीज ग्राहकांचा पुरवठा तोडण्याचे काम केले जात आहेत. यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत. त्यांच्यात आपल्या कार्यालयाविषयी नाराजी निर्माण झाली आहे. तरी याप्रश्नी व दिलेल्या निवेदनाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही, तर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आदमाने यांनी दिला आहे.