बीड - गायरान जमीन खरेदी वक्रीची चौकशी करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपकरत बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी केज येथे छंत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
गायरान जमीन खरेदी विक्रीची चौकशी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार करूनदेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. दुष्काळी परस्थितीमुळे गोरगरीब हवालदिल आहेत. अशा परस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून गोरगरिबांना मदतीचा हात देण्याऐवजी कागदी घोडे नाचवून नागरिकांना त्रास दिला जात आहे, असा आरोप करत पाणी पुरवठा सुरळीत करा, गोरगरीब जनतेला धान्य पुरवठा करा या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी तहसीलदारांना निवेदन देऊन मागण्या पूर्ण न झाल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा रस्ता रोको एक तास सुरू होता. अंदोलनामुळे अंबाजोगाई-मांजरसुंबा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता.