परळी (बीड) - पुण्यातील खासगी कंपनीने नोकरीतून काढून टाकले. त्यामुळे निराश झालेल्या युवकाने गावाकडे येत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (२५ मे) सायंकाळी परळी तालुक्यातील वाघाळा येथे घडली आहे.
अजय बन्सी सलगर (वय २२, रा. वाघाळा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अजय पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. पाच दिवसापूर्वी त्याला कंपनीने नोकरीतून काढून टाकले होते. त्यामुळे हताश झालेला अजय गावाकडे आला होता. नोकरी गेल्यामुळे तो सतत बेचैन असे. अखेर नैराश्यातून त्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.