आष्टी (बीड) - जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण बीड जिल्हा कडकडीत बंद आहे. मात्र आज सकाळीच शहरातील सर्वच दुकाने स्वत: आमदार सुरेश धसांनी उघडण्यास सांगतीले. सुरूवातीला पोलीस दुकाने बंद करत होते. त्यानंतर नगर पंचायत कार्यालयात सुरेश धस, व्यापारी, आणि प्रशासन यांच्या सुमारे दोन तास बैठक झाली. यामध्ये उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी एक नंतर सर्व दुकाने बंद करण्यात आले. पुढील तीन दिवस जिल्हाधिकारी यांच्या नियमाप्रमाणे लाॅकडाऊन राहील. त्यानंतर दिनांक 30 पासून सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत सर्वच व्यवहार राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रशासनाची उडाली तारांबळ-
जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण बीड जिल्हा लाॅकडाऊन करण्याचा आदेश दिला. मात्र हे लाॅकडाऊन मान्य नाही म्हणत दुकाने सुरू ठेवण्याचा पवित्रा आष्टीच्या व्यापाऱ्यांनी घेतला. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळपासूनच उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय अधिकारी विजय लगारे, तहसिलदार राजाभाऊ कदम, नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर, नगर पंचायतच्या मुख्यधिकारी निता अंधारे, संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची व पोलीस प्रशासनाची चांगलीच झुंबड उडाली.
पुढील तीन दिवस आष्टीत कडकडीत बंद-
स्वत: आमदार सुरेश धस हे सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास सांगत असल्याने व्यापाऱ्यांनीही बिनधास्त दुकाने उघडली. त्यानंतर नगर पंचायत कार्यालयात सुरेश धस, व्यापारी व अधिकारी यांच्यात बैठक झाली. यामध्ये दररोज चार तास दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी, पेट्रोलपंप सुरू करा, अशा मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर दिनांक 27, 28 व 29 हे तीन दिवस आष्टीत कडकडीत बंद तर पुढील काळात दररोज सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. आता पुढील तीन दिवस आष्टी कडकडीत बंद राहणार असून, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सुरेश धस यांनी केले.
हेही वाचा- सरकारने खुशाल चौकशी करावी, आम्ही पुरावे न्यायालयात सादर करू - फडणवीस