बीड - जिल्हा रुग्णालयात कोरोनाग्रस्त 78 वर्षिय वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. आज घडीला बीड जिल्ह्यात 121 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून, जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 12 झाली आहे. मंगळवारी सकाळी मृत्यू झालेला व्यक्ती हा बीड शहरातील रहिवासी होता. त्याला उच्च रक्तदाबासह श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आज घडीला बीड जिल्ह्यात 107 सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, 121 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मंगळवारी सव्वा तीनशेहून अधिक स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले आहेत. त्या अहवालाची बीडकरांना प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती -
कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस राज्यात वाढत असून राज्यात सोमवार ४ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, सोमवारी कोरोनाच्या ६ हजार ४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.