बीड - येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका 32 वर्षीय व्यक्तीचा दोन वेळा कोरोना चाचणी अहवाल अनिर्णित आला होता. त्यानंतर तिसऱ्यांदा स्वॅब घेतल्यावर अहवाल येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये सोमवारी घडली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल येणार असून, त्याच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजघडीला जिल्हा रुग्णालयात 11 रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
सदरील तरुण हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील मातकुळी या गावातील रहिवासी आहे. 30 मे दरम्यान मुंबई येथून बीड जिल्ह्यात तो आला होता. सदरील तरुणाचा एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत संपर्क आला होता. मुंबई येथून मातकुळी येथे आलेल्या त्या तरुणांसह पत्नी व मुलांना रुग्णालयात दाखल करून त्यांचे कोरोना तपासणी नमुने घेतले होते. मात्र, दोन वेळा त्या मृत तरुणाचा कोरोना रिपोर्ट अनिर्णित आला होता. रविवारी तिसऱ्यांदा स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यापूर्वीच सदरील तरुणाचा सोमवारी पहाटे बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत सदरील मृत तरुणाचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले. सोमवारी बीड जिल्हा रुग्णालयातून एकूण 23 रिपोर्ट तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. बीड जिल्ह्यात एकूण 63 पैकी 52 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजघडीला 11 रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.