बीड - बीड जिल्ह्यात पक्षांचा मृत्यू होण्याचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव परिसर संसर्गग्रस्त म्हणून घोषित केल्यानंतर आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव शिवारात दोन दिवसात जवळपास 227 कोंबड्या व 2 कावळे तर 1 चिमणी मृतावस्थेत आढळून आली आहे. त्या पक्षांचे नमुने तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून मृृृृृत झालेल्या कोंबड्या व कावळा आणि चिमणीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. मृृृत झालेल्या कोॅबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डाॅ.मंगेश ढेरे यांनी दिली आहे. आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव येथील सरपंच प्रा.राम बोडखे यांनी दि.16 व 17 जानेवारी या दोन दिवसात गावातील शेतकऱ्यांच्या कोंबड्या मृत होत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी यांना दिली. त्यानंतर पशु संवर्धन अधिकाऱ्यांनी या गावात डाॅ. एस. डी. शिंदे, डाॅ. एस. के. गदादे यांच्यासह चार जणांचे पथक दाखल झाले. त्यांना गावातील संजय गजघाट-16, कल्याण गजघाट- 12, संपत सुंबरे- 8, बापुराव गायकवाड-10, छगन बोडखे-25, संजय तरटे-6 तर असिफ बाबा पठाण 150 आशा शेतकऱ्यांच्या कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याचे तसेत गावात दोन कावळे व एक चिमणीचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले. या घटनेचा पशु वैद्यकीय पथकाने पंचनामा केला असून, मृत झालेल्या कोंबड्यांचे व पक्षाचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, उर्वरीत कोंबड्या व पक्षाची अधिकारी यांनी पंचनामा करून ते नष्ट केले आहेत. दरम्यान या कोंबड्यांच्या मृत्यूने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पशुपालक संकटात-
गावामध्ये गेल्या दोन दिवसांत कोंबड्यांचे मृत्यू होत असल्याने सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असून, ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य त्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत. तसेच या कोंबड्या मृत पावल्याने ग्रामिण भागातील आर्थिक स्थिती ढासळत असल्याचे सराटे वडगाव येथील सरपंच प्राध्यापक राम बोडके म्हणाले.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये -
सदरील गावात आम्ही पंचनामा केला असून, मृत झालेल्या कोंबड्याचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविले आहेत. तपासणी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तसेच अजूनही कुठे जर कोंबड्या मरण पावल्या तर कार्यालयाला कळवा परस्पर विल्हेवाट लावू नये, असे अहवान पशु वैद्यकीय अधिकारी एस.डी.शिंदे यांनी केले.