औरंगाबाद - कामगारांना रोजगार द्या, अन्यथा दुष्काळग्रस्त शेतकाऱ्यांसारख्या मजुरांच्याही आत्महत्या होतील, अशी मागणी युवासेनेकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे कामगार बेरोजगार झाल्याने त्याची परिस्थिती खराब असून केंद्राने बेरोजगार मजुरांच्या हाताला काम द्यावे, त्याच्यासाठी उपाय योजना आखल्या पाहिजेत, अशी मागणीही युवासेनेकडून करण्यात आली आहे. या बाबत केंद्र सरकारला पत्रव्यवहार केल्याची महिती शहर सचिव अक्षय खेडकर यांनी दिली.
युवासेनेने कामगारांच्या मदतीसाठी औरंगाबादमधे 'कामगार मदत केंद्र' सुरू केले आहे. या मदत केंद्रात मोबाईल, व्हाट्सअँप आणि ऑनलाईन पद्धतीने कामगारांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसात हजारो मजुरांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम सध्या युवासेना करत असल्याच शहर सचिव अक्षय खेडकर यांनी सांगितलं.
दोन महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या बंदचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या कामगारांना बसला आहे. अशा परिस्थितीत कंपनी मालकांनी दोन महिने काम न केल्याने त्यांना वेतन दिले नाही, तर अनेक ठिकाणी काम नसल्याने मजुरांना कामावरून कमी केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे अक्षय खेडकर यांनी सांगितलं. या मजुरांना आज मदतीची गरज आहे. मजुरांना मदत मिळाली, तर तो पुन्हा जोमाने उभा राहू शकतो, मात्र वेळेवर हाताला काम मिळालं नाही, तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांप्रमाणे कामगार आणि मजूर आत्महत्या करण्याची भीती आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने उपाय करणे गरजेचे आहे, असे अक्षय खे़डकर म्हणाले.
पुढील मागण्या युवासेनेकडून केंद्राला करण्यात आल्या आहेत-
- कामगारांना संचार बंदीच्या काळात मधला पगार देण्यात यावा.
- पुढील वर्षी इएसआयसी कपात न होता, तो जो टॅक्स आहे. तो कामगारांना सबसिडी म्हणून देण्यात यावा.
- कामगारांच्या मुलांच्या चालू वर्षाची शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी.
- औरंगाबाद मध्ये ESIC 1000 बेड संख्या असलेले हॉस्पिटल शहरांमध्ये कामगारांसाठी तयार करण्यात यावे.
- इंटरंशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर पगार देण्यात यावा.
- ESIC कायद्यामध्ये कामगार यांच्या बाजूने महामारी संदर्भात बदल करावा.
- रोजगाराची गरज असलेल्या कामगारांना - मजुरांना रोजगार मिळावा यासाठी उपाय योजना कराव्यात.
लॉक डाऊनच्या काळात आमदार डॉ अंबादास दानवे यांच्या सहकार्याने अनेक वस्त्यांमध्ये राहणाऱ्या मजुरांना मदतीचा हात देत वेळोवेळी मोफत धान्य वाटप केले आहे. मात्र, यापुढे कामगारांना मदतीची गरज असल्याने ही मदत केंद्र सरकार करू शकते. त्यामुळे केंद्र सरकारपर्यंत कामगारांच्या अडचणी मांडण्याचे काम युवासेना करत असल्याची माहिती शहर सचिव अक्षय खेडकर यांनी दिली.