औरंगाबाद - विवाहित स्त्रीसोबत पळून जाणाऱ्या विवाहित पुरुषाला नग्न करून गावात धिंड काढण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. मारहाण करत जिवे मारण्याचाही प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खुलताबाद तालुक्यातील तिसगाव परिसरात घडली. मारहाण झालेला इसम गंभीर जखमी झाला आहेत.
हेही वाचा - टिकटॉक स्टार तरुणाने अपहरण करुन अल्पवयीन प्रेयसीला केली मारहाण, दोघे अटकेत
विवाहित महिलेला पळवून नेल्याच्या रागातून घटना
हा तरुण तिसगाव येथील रहिवासी आहे. विवाहित असलेल्या या तरुणाचे प्रेमसूत गावातील एका विवाहित महिलेसोबत जुळले. त्यातूनच सहा महिन्यांपूर्वी दोघेही गाव सोडून पळून गेले. कन्नड येथे दोघांनी नव्या संसाराला सुरुवात केली. त्यानंतर तो तरुण गावी आल्याचे कळताच पळवून नेलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी त्याला नग्न करून जबर मारहाण केली.
पार्टी करण्याच्या बहाण्याने घेतले सोबत
2 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास हा तरुण तिसगाव येथून आईला भेटण्यासाठी रसूलतांडा येथे जात होता. त्यावेळी त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नातेवाईक रस्त्यात भेटले. त्यांनी त्याला पार्टी करू, असे म्हणत सोबत नेले. त्याला दारू पाजून वाद सुरू केला. इतर नातेवाईकांना जमा करून त्यांनी त्याला नग्न करत त्याची धिंड काढली, जबर मारहाण करून अधमऱ्या अवस्थेत गावाबाहेर मारण्यासाठी फेकून दिले.
हेही वाचा - संतापजनक! फोनवर बोलण्याच्या कारणावरून दोन मुलींना बेदम मारहाण, पाहा VIDEO
व्हिडिओ केला व्हायरल
या तरुणाला मारहाण करत असताना त्याचा व्हिडिओ तयार करून तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे मानसिक छळ करत अवमानस्पद बदनामी केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांत तक्रार देण्यात आली असली, तरी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल न घेता नावाला तक्रार नोंदवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.