औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील ज्ञानेश्वर धोपटे हा युवक औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मित्रासह रूम करून इथे काही महिन्यांपासून वास्तव्यास आहे. गुरुवारी स्पर्धा परीक्षेचा पेपर सोडून तो जात असताना, अचानक त्याच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला. चालू गाडीत गळ्याला फास बसल्याचे लक्षात येताच धोपटे याने मांजा पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत गळ्याला गंभीर जखम होऊन हाताची दोन बोटे देखील कापली गेली. जखम इतकी तीव्र होती की, गळ्यातून रक्ताची पिचकारी उडू लागली. स्थानिक नागरिकांनी तातडीने समोर असलेल्या मेडिसिटी हॉस्पिटल आणि आय.सी.यु.सेंटर येथे जखमीला भरती केले. डॉ. विशाल ढाकरे, त्यांच्या इतर डॉक्टरांनी जखमी युवकावर तातडीने उपचार करत रुग्णाचे प्राण वाचविले.
प्लास्टिक सर्जरी करून केले उपचार : जखमी ज्ञानेश्वर धोपटे याला मांजाने झालेल्या जखमेमुळे मोठा रक्तस्त्राव होत होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी गळ्याला तीन इंच लांब आणि एक इंच खोल एवढी भीषण जखम झाल्याचे सांगितलो. ऑपरेशन करताना त्वचेवर एवढी जखम करण्यास जास्त वेळ लागतो; पण मांजामुळे अवघ्या काही क्षणात एवढी मोठी खोल जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी जखमी युवकावर तातडीने प्लास्टिक सर्जरी करून त्याचे प्राण वाचविले. सध्या त्या युवकाची प्रकृती स्थिर आहे. मांजामुळे असे अनेक अपघात होतात आणि रोज कोणत्या ना कोणत्या रुग्णालयात मांजामुळे जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करावे लागतात अशी माहिती डॉ. विशाल ढाकरे यांनी दिली.
नायलॉन मांजा विक्रीवर बंदी, तरीही विक्री सुरूच : सतत होणारे अपघात पाहता, नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरी सर्रास होणाऱ्या विक्रीमुळे पोलीस यंत्रणेचा धाक उरला नाही का? पतंगबाजी शौकीन नागरिकांना इतरच्या जीवनाची काळजी नाही का? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. मागील काही दिवसात काही व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. असे असले तरी मांजा विक्री सुरूच आहे. हवेत वावरणाऱ्या पक्षांचा जीव जातो म्हणून पक्षीमित्रांनी आंदोलन केली. रोज होणारे अपघात, त्यातून उध्वस्त होणारे आयुष्य त्याबाबतच्या घटना रोजच ऐकायला मिळतात. या सर्वांचा परिणाम म्हणून नायलॉन मांजा विक्रीवर पूर्णत: अंकुश लागणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत आहे.