औरंगाबाद - राज्यातील भीषण दुष्काळाची दाहकता दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत, रस्त्याच्या कामाला वापरण्यात येणारे पाणी भरण्यासाठी महिला चक्क टँकरमागे धावताना दिसत आहे. हे दृश्य औरंगाबादच्या फुलंब्री रस्त्यावरचे आहे.
फुलंब्री तालुक्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून आलेल्या टँकरमधील पाणी भरण्यासाठी नागरिकांना धावपळ करावी लागत आहे. औरंगाबाद-सिल्लोड महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर केला जात आहे. या टँकरमधून गळणारे पाणी आपल्या बकेट आणि हंड्यात भरण्यासाठी तीन महिला टँकर मागे धावत आहेत. या दृश्यावरून जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकदा दिसून येते.
पाणी भरत असताना यातील एखाद्या महिलेच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. दुष्काळी गावांना पाण्याचे टँकर जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्याने सरकारी यंत्रणा करत असलेला दावा कितपत सत्य आहे, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.