पैठण (औरंगाबाद) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीसुद्धा पंढरपूरच्या आषाढी पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक वारकऱ्यांनी नाराजी दर्शविली आहे. पैठण येथील वारकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. पैठण तालुक्यातील आपेगाव हे वारकरी संप्रदायातील पाया मानले जाणारे संत ज्ञानेश्वर माऊली यांची जन्मभूमी आहे. येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर विष्णू महाराज, कोल्हापूर यांनी याबाबत निवेदन दिले आहे.
निवदेनात त्यांनी कळविले आहे की, संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई या चार भावंडाची जन्मभूमी भागवत धर्माचे व वारकरी सांप्रदायाचे मुळ उगम स्थान आपेगाव आहे. याच आपेगावातून पंढरपूरच्या पायी वारीची 842 वर्षांची अखंड परपंरा सुरू आहे. मात्र, कोरोना काळात गेल्या दोन वर्षीपासून माऊली दिंडी संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शासन स्तरावर ई-मेल निवेदन दिली. मात्र, महाराष्ट्र शासनाने आपेगाव येथून निघत असलेल्या 842 वर्षांच्या पायी वारीसोहळ्याचा विचार केला नाही. तसेच मानाच्या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान न दिले नाही. याच्या निषेधार्ध वारकऱ्यांसह संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आपेगाव येथे 12 जुलैला सोमवारी आत्मदहन करणार आहे, अशी माहिती हभप ज्ञानेश्वर विष्णू महाराज यांनी दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार,पोलीसनिरीक्षक यांना हे निवेदन दिले आहे.
परवानगी देण्याची मागणी -
पंढरपूरला जाण्यासाठी जसे मानाच्या 10 पालख्यांना परवानगी दिल तशीच 842 वर्षांची आपेगावहुन निघत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची शासनाने नोंद घ्यावी. जर 12 जुलैपर्यंत आम्हाला परवानगी दिली नाही तर आम्ही पंढरपूरला जाणारच आणि तसेच प्रशासनाकडून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झालाच तर पालखी मार्गावरील ठिकठिकाणी माऊली भक्त, वारकरी आपेगाव येथील मंदिरात आत्मदहन करणार, अशी माहिती हभप ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूर यांनी दिली. पत्रकार परिषदेला शिवाजी महाराज सेलुकर, भाऊसाहेब औटे, रामचंद्र औटे, आन्नासाहेब औटेंसह गावकरी उपस्थित होते.
वाखरी येथून पायी वारी करण्याची परवानगी -
राज्य सरकारकडून आषाढी वारी सोहळा हा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आळंदी व देहू संस्थांच्या पालख्यांसोबत 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित आठ मानाच्या पालख्यांना 50 सदस्य वारीसाठी बसच्या माध्यमातून घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. यासाठी राज्य सरकारकडून 20 एसटी बसेची सोय करण्यात आली आहे. मानाच्या पालख्या वाखरी येथे आले असता, दीड किलोमीटर पायी दिंडी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आषाढी एकादशीला 195 महाराज मंडळींना मुखदर्शनाची सोय केली जाणार आहे. या सर्वांमध्ये कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.
पायी वारी नसल्याने वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त -
कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्राच्या तोंडावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदा ही राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली. हा निर्णय मान्य नसलेल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांना आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे कराडकरांनी जाहीर केले. त्यानुसार पहाटे पाचच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. या सर्वांना सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले. मात्र, पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलं.
आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिर राहणार बंद -
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून राज्य सरकार जे कोरोना नियम घालून देणार आहे. या नियमाप्रमाणे आषाढी एकादशी सोहळा पार पडणार आहे. आषाढी वारी दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, परंपरेनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर 24 तास खुले ठेवण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे.