औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, म्हणून मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पूजा चव्हाण नावाच्या एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी संजय राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच भविष्यात मी दोषी आढळून आले तर कायमचा बाजूला होईल, असेही ते म्हणाले. भाजप सतत माझ्यावर आरोप करत आहे. मात्र, ते सतत माझ्यावर आरोप का करत आहेत याचे मी आत्मचिंतन करत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
राज्य मागासवर्गीय व्हीजेएनटीचे सर्वेक्षण करावे -
ओबीसी आरक्षण रद्द आहे. हे आरक्षण पुन्हा देण्यात यावे यासाठी राज्याने मागासवर्गीय आयोगाने नेमला आहे. हा आयोग राज्यात सर्वेक्षणकरून त्याचा डाटा तयार करणार आहे. राज्य मागासवर्गीय व्हीजेएनटीचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.
हेही वाचा - खळबळजनक विधान अंगाशी; नाना पटोले यांच्यावर घुमजावची ओढवली नामुष्की
माझ्यावर झालेले आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर टीका केली जात होते. त्यामुळे राजीनामा दिला. त्याची चौकशी समिती नेमण्यात येईल. त्यात मी निर्दोष असेल तर मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र, मी दोषी आढळून आलो तर मी स्वतः कायमचा बाजूला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बहिण खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार, अशी चर्चा होती. याबाबत ते म्हणाले, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बाबतीत पक्षाने घेतलेली भूमिका अन्याय करणारी असल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. मात्र, त्या स्वतः अन्याय झाला नाही असे बोलत आहेत. यावर काय बोलावे? असे प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेबाबतही त्यांनी बोलणे टाळले.
काय आहे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर आली होती.