औरंगाबाद - कोरोनाने जिल्ह्याच्या पोलीस विभागात शिरकाव केला आहे. पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. बाधित पोलिसांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
रेल्वेस्टेशन भागात राहणाऱ्या पोलीस निरीक्षकाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबातील इतर तिघांना कोरोनाची लागण झाल्याचो समोर आले. तर इतर दोन कर्मचारी भाऊ असून त्यांच्या वडिलांनी कोरोनाची लागण झाल्याने या दोघांनाही संसर्ग झाला. या सर्वांवर खासगी रुग्णालयात पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतून उपचार केले जात असल्याची माहिती पोलीस विभागाने पत्रक काढून दिली आहे.
औरंगाबादमध्ये गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे २३ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या 375 वर गेली आहे. तर चार रुग्णांना उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहे. असेंफिया कॉलनीतील 95 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 12 वर गेला आहे. पोलीस निरीक्षकांचा मुलगा दिल्लीहून आल्यावर शहरात त्याला संसर्ग झाल्याने या कुटुंबात कोरोनाने प्रवेश केला.