औरंगाबाद - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना औरंगाबादमध्ये आणखी दोन रुग्ण असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका महिलेला आणि पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असून या दोघांची नव्याने चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी जिल्हा रुग्णालयात कोरोनाची लक्षण असलेल्या नऊ जणांच्या लाळेचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोघांचे अहवालाबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या दोघांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवले असून दोन दिवसांनी त्याचा अहवाल प्राप्त होईल.
हेही वाचा - धक्कादायक..! कोरोनाच्या दहशतीमुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ, दिसतात अशी लक्षणे
ज्या संशयितांचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत त्या मध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुण्याहून हे शहरात दाखल झाले आहेत. शहराच्या वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या या दोन रुग्णांना सर्दी, ताप, खोकला असल्याने दोघांची तपासणी करण्यात आली. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोग शाळेत हे नमुने तपासण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा पुण्यातील प्रयोगशाळेत हे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.