औरंगाबाद - वाळूज एमआयडीसी येथे सोमवार (ता.४) दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद केले. दरम्यान, त्यांच्याकडे असलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी वाळुज औरंगाबाद येथेल कोलगेट कंपनी जवळ अमोल देशमुख यांना गुप्तबातमीदार मार्फत माहिती मिळाली, की साई केक शॉपचा मालक हा अवैधरित्या पिस्तुल बाळगून आहे. गुप्तबातमीदाराने दिलेली माहीती वरिष्ठांना सांगून, त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जयभवानी चौक एमआयडीसी वाळुज येथे असलेल्या साई केक शॉप मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानात असलेल्या लाकडी फर्निचरमध्ये एक अग्निशस्त्र (पिस्तुल), मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
अवैधरित्या शस्त्र बाळगणारा दुकान मालक बळीराम ज्ञानेबा वाघमारे (२०) याला विचारपुस केली असता, त्याने सदरचे पिस्तुल हे अनिरुध्द (उर्फ बाळु) भारत मिसाळ (२९) याने ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांकडे मिळालेला एकुण २४,००० रुपये मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. तसेच, पुढील कारवाई करता एमआयडीसी वाळुज पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. यामुळे गावागावांतील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यात गुन्हेगारांनी देखील तोंड वर काढायला सुरुवात केली. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळेच पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.