औरंगाबाद - मंगळवारी 31 ऑगस्ट रोजी दिवसभर मराठवाड्यात पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी छोट्या नद्या भरून वाहल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. त्यात सोयगाव तालुक्यात नदीत वाहून जाणाऱ्या एकाला नागरिकांनी वाचवले असल्याची देखील माहिती आहे.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी 42%वर पोचली -
सिल्लोड शहरासह तालुक्यात मंगळवारी सकाळी 5 पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील भराडी, अंधारीत, केऱ्हाळा, घाटनांद्रा, गोळेगाव, अजिंठा, शिवाना, आंभाई परिसरात जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील खेळणा नदीला पूर आल्याने तालुक्यातील पिंपळगाव घाट शेखपूर परिसरातील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, बरेच दिवसापासून दांडी मारलेल्या पावसाने काल सायंकाळी सात वाजता पैठण तालुक्यात हजेरी लावली संततधार पावसामुळे पैठण तालुक्याचा शेतकरी सुखावला आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 42%वर पोचली आहे. तसेच पैठण तहसील कार्यालयाने महाराष्ट्रभर होणाऱ्या पावसाची परिस्थिती पाहता ग्रामीण व शहरी भागात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?