औरंगाबाद - (सिल्लोड) रस्त्यावर वाद घालणाऱ्या आठ जणांना भरधाव जीपने धडक दिल्याने तीन जण ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री उशिरा सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील मोढावाडीजवळ घडली. दरम्यान, जीपचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके नेमण्यात आली आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी दिली.
गुलाब नबी गणी पठाण (३५, रा. मोढा खु.), शेख नईम मजिद (३५, रा. जामा मस्जिद, सिल्लोड), शेख हमीद शेख अमीन (३२, रा. मोबिनपुरा, सिल्लोड) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मण सखाराम कल्याणकर (रा. मोढा खु.), अफजल खाँ मस्जिद खॉ पठाण (रा. ईदगाह, सिल्लोड), शेख फय्याज शेख अजीज, हुजेब खॉ नूर खाँ पठाण, समीर खान अजीज खान (दोघे रा. वांगी) हे पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लक्ष्मण कल्याणकर व गुलाब नबी हे सिल्लोडहून दुचाकीवर गावाकडे जात होते. याच दरम्यान समोरून दुचाकीवर दोघे सिल्लोडकडे जात होते. त्यातील एक जण जवळ येताच कानाजवळ ओरडला. यामुळे गावाकडे जाणारे घाबरले. त्यांनी मोढावाडी जवळ त्यांना थांबवले व जाब विचारला. यातून त्यांच्यात वाद सुरू झाला. याच दरम्यान भराडीकडून सिल्लोडकडे मका भरलेला ट्रक जात होता. रस्त्यावरील वाद पाहून त्यातील तिघे जण खाली उतरले. वाद सोडवण्याचा प्रयत्न करीत असताना अपघात घडला.
भर रस्त्यात वाद सुरू असताना एका जीपने या जमावाला जोराची धडक दिली. यात गुलाब नबी हा जागीच ठार झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. यातील सदर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील अंधारे यांनी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पाठवले.
भांडण सोडवणे पडले महाग..
या अपघातात ट्रकमधील शेख नईम मजिद, शेख हमीद शेख अमीन हे ठार झाले, तर एक जण जखमी आहे. हे तिघे हमालीचे काम करतात. भराडी येथून मकाचा ट्रक भरून त्यातून ते घरी जात होते. रस्त्यातील वाद सोडवण्यासाठी हे तिघे थांबले व या दरम्यान अज्ञात जीपने धडक दिली. यात दोघे ठार झाले. हमालीचे काम करणाऱ्या या दोघांना भांडण सोडवणे चांगलेच महाग पडले असून त्यांच्या कुटुंबांनी घरातील कमावते गमावले आहेत.