औरंगाबाद - समाजात तेढ निर्माण होईल, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे २ व्हिडिओ व १ फेसबूक पोस्ट मागील काही दिवसांपासून शहरात व्हायरल होत आहे. यावर शहरातील सर्वच स्तरात चर्चा सुरू असून पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणाात ३ स्वतंत्र गुन्हे दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शहरात प्रत्येक उमेदवारांच्या समर्थकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. परंतु, काही तरुणांनी मात्र आमदार, खासदार तसेच नेत्यांना शिवीगाळ करणारी व्हिडिओ आणि धर्मा संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारी एक पोस्ट व दोन व्हिडिओ तयार केले. निकालानंतर तणावाच्या वातावरणात ते व्हायरल होऊन तणावात भर पडली. विविध व्हॉट्सअॅप ग्रुप व सोशल मीडियावर ते वाऱ्यासारखे पसरले. रविवारी शहर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत उस्मानपुरा, जिन्सी, सिटी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणात अज्ञातांवर फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपींचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी सांगितले.
शहराची सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने तसेच दोन समाजामधे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. व्हिडिओ तयार करणाऱ्यांसोबतच तो शेअर करणारे, त्यावर कमेंट करणारे व तसेच फक्त लाईक करणाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा समाजघातक कृत्यांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.