पैठण (औरंगाबाद) - शहरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर, भू-माफिया सक्रिय झाले असून नगरपरिषद विभागाच्या कोट्यवधींंच्या जमिनीवर अवैध कब्जा केला आहे. या भू-माफियांंच्यामागे राजकीय नेत्यांचे आशीर्वाद असल्याचे निदर्शनास आले तसेच कर्मचारीही मलिदा खात या भू- माफियाला आश्रय देत असल्याची चर्चा आहे.
करोनाने जगात सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पैठण तालुक्यात सध्या परिस्थिती 73 रुग्ण असून मागच्या आठवड्यात जवळजवळ 13 रुग्णांची भर पडल्याने प्रशासन जागे झाले आहे. त्यानंतर पैठण संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासकीय यंत्रणा विशेषतः नगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचारी कोरना प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात गुंतल्याने पैठण शहरात नगरपालिकेच्या मालकीची असलेली कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर भूमाफिया कब्जा करत असल्याचे दिसत आहे.
पैठण शहरातील पोलीस ठाण्यासमोर, नगरपालिकेच्या मालकीचे असलेले समाज मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला भंगार तसेच लोखंडी शेड टाकून अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच राजीव गांधी शॉपिंग सेंटर जुना नगर रोड याठिकाणी नगरपालिका मालकीचे शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे असलेल्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे वाचनालयाच्या शेजारी असलेली दुमजली इमारत एका चप्पल व्यापाऱ्याने ताब्यात घेतल्याचे निदर्शनास आले आहे. एवढेच नव्हे तर यात्रा मैदान ठिकाणी असलेले सुमारे 22 आरसीसी गाळे अधिकृत की अनधिकृत या विषयावर जिल्हा सत्र न्यायालयाचे (कोर्टात) निकाल प्रलंबित असलेल्या मालमत्तेवर या भूमाफियांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहे.
राजीव गांधी शॉपिंग सेंटरच्या मागे झालेल्या अतिक्रमणाबाबत दुकानदारांंनी तक्रार दिली असून तक्रारदाराला व्हाट्सअप वर बोलताना पैठण नगरपालिका मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी याबाबत कबुली दिली. "लोक ऐकत नाही, वाद घालतात. आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागेल", असे नगरपालिका मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी स्पष्ट केले.