औरंगाबाद - घरात किरकोळ वादानंतर सतरा वर्षीय मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली. काही तासाने मात्र ती थेट विहिरीत पडलेली दिसली. वडिलांनी भाऊ व इतर दोघांच्या मदतीने बाहेर काढले. त्यानंतर मदतीसाठी आलेले लोक निघून गेले. वडिलांनी घरातील इतरांना घरात बंद करुन मोठ्या मुलीला थेट विहिरीजवळ पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार दिवसानंतर पोलिसांना गावातील हा प्रकार कळाला. बुधवारी उशीर झाल्याने आता गुरूवारी मुलीचा पुरलेला मृतदेह पुन्हा वर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुलीचा मृत्यूचे कारण समोर येईल. परंतू मुलगी विहिरीत सापडल्यानंतर तिला परस्पर पुरण्याची घाई का केली, कुटूंबातील इतरांना घरात का कोंडले, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. राधा जारवाल असे मुलीचे नाव आहे.
पोलीस तपासात गुन्ह्याची बरीचशी उकल
दौलताबाद परिसरातील टाकळीकदीम गावात शेतकरी कैलास जारवाल राहतात. त्यांना पत्नी, तीन मुली व दोन मुले आहेत. २२ सप्टेंबर रोजी दुपारी दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांना टाकळीकदीम गावातून कॉल प्राप्त झाला. गावातील एका सतरा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचे कॉलवरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर आडे यांनी तत्काळ इतर सहकाऱ्यांसह गावात धाव घेतली. जारवाल कुटूंबाच्या घरी पाेहोचल्यानंतर कोणीही काही बोलायला तयार नव्हते. विचारपूस सुरू केल्यानंतर जारवाल यांनी त्यांना तीन मुली व दोन मुले असल्याचे सांगितले. मात्र, मोठी मुलगी राधा कुठे आहे, असे विचारताच कुटूंबातील सर्वच जण शांत झाले. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर तिच्या वडिलांनी तीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली. मात्र, त्याव्यतिरीक्त काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी कुटूंबातील इतर सदस्यांची चौकशी सुरू केल्यावर वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत गेली.
सर्वच प्रश्न अनुत्तरीतच, संशय मात्र कायम
-संपूर्ण घटनेत मुलगी बेपत्ता झाली हे निश्चित झाले. मात्र, तिचे काय झाले, याबाबत मात्र काहीच निश्चित होऊ शकले नाही. परंतु, प्राथमिक चाैकशीत मात्र तिला ज्या विहिरीत पडलेली सापडली त्याच विहिरीच्या शेजारीच कुठलीही खातरजमा न करता थेट पुरल्याचा दाट संशय पोलिसांना आहे.
- मुलीने आत्महत्या केली तर तिला विहिरीतून काढल्यानंतर इतर नातेवाईक निघून का गेले ? ते गेल्यानंतर मुलीला काही वेळ घरासमोरील बाजेवर ठेवले. त्यानंतर वडिलांनी घरातील सदस्यांना आतच थांबवून वडिलांनी तिला एकट्याने नेऊन शेतात परस्पर का पुरले ?
कुटूंबाच्या जवाबात पोलिसांना नेमका अंदाज आला
पोलिसांनी कुटूंबाच्या इतर सदस्यांची चौकशी केली. त्यात राधाच्या दोन लहाण बहिणी व भावांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. संध्याकाळी राधा स्वयंपाक करत होती. त्याच वेळी वडिलांनी तिला मारले. त्यातून ती घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही राधा दिसत नसल्याने कैलास यांनी शोध सुरू केल्यावर शेतातील विहिरीत ती आढळून आली. त्यांनी भावकीतील नातेवाईकांना बोलावले. त्यांनी राधाला वर काढले. ती मृत्यूमुखी पडल्याचे त्यांनी परस्पर ठरवले व नातेवाईक निघून गेले. बाजेवर राधाला ठेवल्यानंतर इतर मुलांना, पत्नीला घरातच थांबवले. त्यानंतर कैलासने मुलीला घेऊन जाऊन थेट त्याच विहिरीच्या जवळ पुरले. धक्कादायक प्रकार निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी गंगापूर तहसील कार्यालयाला प्रकार कळवला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राधाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, विहिरीजवळ मातीचा थर व त्यावर झाडांच्या फांद्या आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य