औरंगाबाद - अहमदनगरहून बुलेट बाईक चोरलेल्या पैठण तालुक्यातील दोघांना गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी कांचनवाडी भागात पकडले. त्यांच्याकडून बुलेट जप्त करण्यात आली आहे. नंदु अशोक गरड (रा. तोडली, बिडकीन, ता. पैठण) आणि सुदाम किसन घटे (रा. मांडवा, ता. पैठण) अशी बुलेट चोरांची नावे आहेत.
कांचनवाडी भागात बुलेट विक्रीसाठी दोघे जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र साळुंके, संदीप क्षीरसागर, संजय जाधव, प्रभाकर राऊत, नितीन देशमुख यांनी कांचनवाडी भागात सापळा रचला. शनिवारी सायंकाळी पोलीस चौकीजवळ बुलेट घेऊन आलेल्या गरड आणि घटेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोघांची चौकशी केल्यावर त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. तेव्हा दोघांना खाक्या दाखवताच त्यांनी अहमदनगर येथून बुलेट चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करुन अहमदनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.