औरंगाबाद- कोरोनाचा देशात प्रसार केल्या प्रकरणी मरकज धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या भारतीय व विदेशी लोकांवर दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि एम. जी. शेवलीकर यांच्या खंडपीठाने दिला. त्यामुळे विदेशातून आलेल्या व भारतात अडकलेल्या सर्व विदेशी भाविकांचा मायदेशी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिल्लीच्या निझामुद्दीन येथे मार्च महिन्यात मरकजला आलेल्या दोन ते अडीच हजार विदेशी नागरिकांवर देशात कोरोनाचा संसर्ग पसरवल्या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते. अहमदनगर येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी 30 विदेशी आणि 7 भारतीय नागरिकांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. याचिकाकर्त्यांच्या बाजूने अॅड. मजहर जहांगीरदार यांनी बाजू मांडत दाखल झालेले गुन्हे चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
मार्च महिन्यात दिल्लीच्या निजामोद्दीन येथील मरकजसाठी आलेल्या भाविकांनी देशात वावर केल्याने कोरोनाचा प्रसार झाल्याचा आरोप करत देशातील जवळपास तीन हजार भाविकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अहमदनगर येथे गुन्हे दाखल असलेल्या 30 विदेशी आणि 7 देशातील भाविकांनी दाखल केलेले गुन्हे चुकीचे असल्याचे सांगत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
आम्ही ज्यावेळी भारतात आलो त्यावेळी आमची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. तेव्हा आमची प्रकृती चांगली होती. आम्ही परवाना घेऊन आलो त्या परवण्यावर आम्हाला देशातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची मुभा होती. असे असताना आम्हाला विनाकारण त्रास देण्यात आला. आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्हाला जवळपास 30 ते 40 दिवस कारागृहात राहावे लागले. प्रसिद्धी माध्यमांनी देखील आम्हाला दोष दिला, असे मुद्दे खंडपीठात मांडण्यात आले. न्यायालयाने हे सर्व मुद्दे ग्राह्यधरून दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मरकज प्रकरणानंतर भारतात अडकलेल्या भाविकांना आपल्या देशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचा फायदा देशात इतर ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या भाविकांना होणार आहे. याचिककर्त्यांच्या बाजूने अॅड. मजहर जहांगीरदार यांनी बाजू मांडली.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये गणेशोत्सवात असणार ड्रोनची नजर